शांता नाव तिचं. सावळी पण नाकी डोळी खूप छान. चार चौघात उठुन दिसेल असा चेहरा पण नावाप्रमाणे स्वभाव नाही. खूप संशयी आणि भांडखोर स्वभाव. उगाच छोट्या छोट्या कारणांवरून भांडण करणारी. गुणाजी अगदी साधा .नवरा शांताचा. शांता भांडायला लागली की हा गप्प. शांता सगळा राग नवऱ्यावर काढायची. सासू सुनेची भांडणं तर रोजचीच आणि दोघांमध्ये अडकीत्यातल्या सुपारी सारखा गुणाजी. खूप राग यायचा त्याला बायकोचा पण शांत बसायला लागायचं. कारण ह्या महामाये सोबत कोण भांडण करणार
दिवसामागून दिवस जात होते. आणि एके दिवशी रात्री शांताच आणि तिच्या सासुच कडाक्याचे भांडण झालं कशावरून तरी. त्यात गुणाजी दारू प्यायलेला त्यादिवशी. दारूच्या नशेत बायकोला नको नको ते बोलला . हिच्या पण काय मनात आलं हिने रागाच्या भरात रॉकेलची बाटली अंगावर ओतून घेतली आणि पेटवून घेतल स्वतःला. काळा ठिककर देह राख रांगोळी झाली शांताची. गुणाजी ने तिला वाचवायचा खूप प्रयत्न केला पण नाही वाचवू शकला तो शांताला. शांता आता कायमची शांत झाली होती.
दाहाव्याला पिंडला कावळा शिवला नाही. खूप विनवण्या केल्या खूप आश्वासन दिली गुणाजीने. तुझ्या मुलांकडे नीट लक्ष देईन . शांता काळजी करू नकोस एवढ सगळं करून पण काही उपयोग नाही. मग ब्राम्हणाने दर्भाचा (गवताचा) कावळा बनवला आणि पिंडदान उरकून घेतलं. इकडे गुणजीचा जीव काही थाऱ्यावर न्हवता त्याला वाटत होते शांताच्या बऱ्याच इच्छा अपूर्ण राहिल्या तिन वर्षांचा विकास आणि एक वर्षाच्या सुमनला मागे ठेवून शांता काशी काय गेली.अस कस काय केलं तिने. जिवंत असताना देखील त्रास दिला आणि आता तिच्या आठवणीने देखील त्रास होतोय स्वतःचा मनाशी बोलत गुणाजी चालत होता.
सगळेजण आपापल्या कामात व्यस्त झाले. दिवसामागून दिवस जात होते पण अचानक एक दिवस रात्री पौर्णिमा होती त्या दिवशीं. गुणजीची आई परसात गेली होती. तिकडे कोणीतरी असल्या सारखा भास झाला तिला ती अजून थोडी पुढे गेली. तीच देहयष्टी. मोकळे केस सोडलेले. शांताच होती ती. पांढराफटक चेहरा त्यात पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश त्यात ती अजून पांढरी दिसत होती.शांतेच्या सासूने किंकाळी फोडली. त्या आवाजाने गुणजीची झोप उडाली तो बाहेर आला त्याने बघितल तर आई खाली जमिनीवर पडलेली दिसली. शुद्ध हरपलेली म्हातारीची. थोड्यावेळाने शुद्धीवर येताच तिने गुणाजीला बघितलेल्या गोष्टीं बदद्दल परत आलेल्या शांतें बद्धल सांगितलं. गुणाजी म्हातारीला समजावून सांगत होता भास झाला असेल तुला आई.घाबरू नकोस पण मनातून तो प्रचंड घाबरलेला होता त्याला पिंडदानाचा दिवस आठवला आणि तो गवताचा कावळा. त्यानं स्वतःलाच विचारले ती परत आली असेल का. शेवटी माझंच खर झालं .वाटलेलंच मला ती परत येईल. इतक्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तिच्या.विचार करत करत गुणाजी झोपी गेला. त्या दिवसा नंतर मग गावातल्या बरेच जणांना तिने घाबरवून सोडलं. बरेच जणांना ती कुठे कुठे दिसली होती.
आजचा दिवस माझा होता. दिवस म्हणण्या पेक्षा रात्र. अशीच एक रात्र त्यावेळी मी गावी होतो मामे भावाकडे. गावच्या वाडी मध्ये म्हणजे खालच्या वाडी मध्ये एका मुलाच्या लग्नाच्या हळदीचा समारंभ होता. कोकणात बरेचदा हळदीला उशीर होत असे. हळदी समारंभाला माझी मामी सुद्धा गेली होती तिला परतायला खूप उशीर झाला रात्रीचे 12 वाजून गेले असतील.
आम्ही सगळे गाढ झोपलो होतो मी आणि माझा मामे भाऊ वर खाटेवर, आणि माझा सक्खा धाकटा भाऊ खाली झोपला होता त्याच्या बाजूला माझ्या दोन मामे बहीण झोपल्या होत्या आणि सोबत एक बाई त्या पेइंग गेस्ट राहत होत्या. त्या गावच्या शाळेत शिक्षिका होत्या.मामी हळदी समारंभ उरकून परत आली .मामा बाहेर अंगणात झोपले होते. मामी येणार म्हणून आतून दाराला कडी लावली न्हवती
मामीने दरवाजा उघडला आणि तिने माझ्या बहिणीला आवाज दिला शालू माझ्या बहिणीच नाव शालिनी तिला आवाज दिला शालू झोपलीस काय. आवाजामुळे तिघीही उठल्या पण जोरात किंचाळत. मी आणि माझा भाऊ खाटेवरून ताडकन उठलो मी लाईट चालू केली बघतो तर समोर मामी उभी. पण माझ्या बहिणी आणि ती पेइंग गेस्ट आम्हाला दिसल्या नाहीत नंतर कळले की त्या खाटेच्या खाली जाऊन लपल्या होत्या.माझा धाकटा भाऊ मात्र किंचाळीच्या आवाजाने घाबरून तोंडावर पांघरूण घेऊन झोपला होता. मला आणि मामे भावाला आणि माझ्या मामाला काहीच कळलं नाही की काय झालंय आम्ही माझ्या बहिणींना आणि त्या शिक्षक बाई ना खाटे बाहेर बोलावलं थरथर कापत होत्या त्या .मी माझ्या धाकट्या भावाला उठवलं तो ही घाबरत उठला त्यालाही नेमकं काय झालं माहीत नव्हत. थोडयावेळाने बहिणींना आणि त्या मॅडम ना पाणी पाजल मग त्यांना विचारलं काय झालं. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मी तर घाबरूनच गेलो. मामीने जेव्हा दरवाजा उघडून आवाज दिला तेव्हा या तिघी उठल्या पण त्यांना मामी दिसलीच नाही त्या तिघीना ती दिसली शांता. तीच्या सासूला दिसली तशीच कुंकू लावलेली, केस मोकळे सोडलेली पांढरीफट शांता .भयानक अशी आणि तिला बघूनच तिघी खाटेखाली लपल्या.
शिक्षक बाईंनी सगळ्यांना साईबाबांचा अंगारा लावला. मामी ला पण कशी दिसली नाही ती सगळ्यांना पडलेला हा प्रश्न . शिक्षक बाई सांगू लागल्या की हळदीच्या अंगाला भुतं येतात .शांता देखील हळदीच्या वासाने मामीच्या मागून चालत आली असेल.आणि दरवाजा उघडला तेव्हा मामीसमोर उभी राहिली. लाईट लावताच ती नाहीशी झाली
मामीला पण काहीच कळाले नाही. दुसऱ्या दिवशी मामी तिच्या एका चुलत भावाकडे गेली तो भगत म्हणजे ( मांत्रिक ) होता त्याने पण तिला संगीतल की तीच आली होती त्यानं मग विभूति वैगरे देऊन मामीला सांगितलं काही काळजी करू नको मी बघतो काय ते.
तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. मी तिला बघितलं नाही किंवा माझ्या भावाने देखील नाही आणि प्रत्यक्षात जिच्या मागून ती आली त्या माझ्या मामीने पण नाही. पण त्या तिघींच काय. एकीला भास होऊ शकतो पण तिघीना पण. त्या तिघीनी पण सांगितलं त्यांनी तिलाच बघितलं शांतेला.
आजही शांता आपल्या अस्तित्वाची ओळख करून देते. कधी मिळेल मुक्ती तिला माहीत नाही....
हे सगळं अकल्पित आहे पण जर जगात चांगल्या गोष्टी असतील तर त्या विरुध्द वाईट गोष्टीं पण असतील ना.
।। शुभम भवतु ।।
प्रदीप मोहिते